मुंबई – सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने काही सकारात्मक मुद्दे दिले आहे. हे मुद्दे लोक आणि कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांकडे सोपवण्यात येत आहे. त्यांनी हे सर्व मुद्दे जिल्हाप्रमुखांना कार्यकर्त्यांना समजून सांगायचे आहेत, असे आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ठाकरे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांना सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज दुपारी दादरच्या शिवसेना भवनात सर्व जिल्हा संपर्कप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांची बैठक घेतली. ही बैठक संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, ‘जनता आणि कार्यकर्त्यांपर्यंत सुप्रीम कोर्टाचा निकाल समजून सांगण्याचे जबाबदारी उद्धव ठाकरेंनी सर्व जिल्हाप्रमुखांकडे सोपवली आहे. त्यासाठी जिल्हाप्रमुखांना निकालाची प्रत देण्यात आली आहे.`
‘दोन दिवसांपूर्वी आमदारांना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सत्तासंघर्षाच्या निकालाची प्रत देण्यात आली होती. उद्धव ठाकरेंनी आजच्या बैठकीमध्ये जमलेल्या सर्व जिल्हाप्रमुखांना या निकालाची प्रत दिली आहे. सुप्रीम कोर्टाने आपल्या बाजूने काही सकारात्मक मुद्दे दिले आहे. हे मुद्दे ठळक करून निकालाची प्रत तळागाळातील जनतेपर्यंत आणि कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी जिल्हाप्रमुखांवर सोपवली आहे. जिल्हाप्रमुखांना हे सर्व मुद्दे कार्यकर्त्यांना समजून सांगायचे आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सरकारविरोधात लागला आहे. परंतु काही जण पेढे वाटत आहेत. प्रतोद म्हणून गोगावले आणि गटनेते म्हणून शिंदेंना सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवले आहे, ते कार्यकर्त्यांला पटवून द्या, असे सांगण्यात आल्याचे दानवे म्हणाले,
मुंबईमध्ये १८ जूनला शिवसेना पदाधिकाऱ्यांचा भव्य मेळावा होणार आहे. तसेच १९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन उत्साहात साजरा केला जाणार आहे. या मेळाव्यात तालुका, जिल्हा पातळीवरील शिवसैनिक उपस्थित होणार आहे, अशीही माहिती दानवे यांनी दिली.