नवी दिल्ली – कोरोनील हे पतंजलीने कोरोनावर औषध असल्याचे पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले होते. कोरोनावर हे पहिले औषध असल्याचा दावा रामदेव बाबा यांनी या पत्रकार परिषदेत केला होता. त्यांच्या या दाव्याला जोरदार विरोध झाला. हे प्रकरण न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने रामदेव बाबा यांना फटकारले. कोरोनील हे कोरोनावरील औषध असल्याचा दावा मागे घ्या. हे औषध केवळ रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे असून, त्याने कोरोना बरा होत नाही, असा उल्लेखही औषधावर करण्याचा आदेश कोर्टाने दिला.
अॅलोपॅथी उपचार पद्धतीमुळेच कोरोना काळात लाखो लोकांचे मृत्यू झाले हे ट्विट परत घेण्याचे आदेश दिले. पुढील तीन दिवसांत ही विधाने मागे घेतली नाहीत तर सोशल मीडियावर केलेले हे दावे काढण्याचा आदेश आम्ही सोशल मीडिया मालकांना देऊ, असेही कोर्टाने बजावले.
न्यायमूर्ती अनुप जयराम भंभांनी यांनी या संदर्भात देशभरातील डॉक्टरांच्या विविध संघटनांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान हे आदेश दिले. 2021 साली डॉक्टरांच्या संघटनेने बाबा रामदेव, आचार्य बालकृष्ण आणि पंतजली आयुर्वेद या कंपनीच्या विरोधात याचिका दाखल केली होती. यामध्ये त्यांनी म्हटले होते की, या तिघांनी कोरोनील या औषधाविषयी फसवे दावे केले होते. या औषधाने कोरोना बरा होतो असा प्रचार त्यांनी केला. मात्र वास्तवात पतंजली कंपनीनेच या औषधासाठीचा परवाना घेताना रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे औषध या श्रेणींतर्गत परवाना घेतला होता. त्यानंतरही या औषधाने कोरोना बरा होतो, अॅलोपॅथी औषधांचा उपयोग होत नाही, अशी चुकीची माहिती पसरवण्यात आली. बाबा रामदेव हे एक प्रभावशाली व्यक्तिमत्त्व असल्याने त्यांच्या विधानामुळे सर्वसामान्यांच्या मनात अॅलोपॅथी औषधांविषयी संशय निर्माण झाला. त्यांची ही विधाने केवळ अॅलोपॅथी औषधांच्या कार्यक्षमतेवरच नव्हे तर कोविड लसीबद्दलही संशय निर्माण करणारी होती. बाबा रामदेव यांना अशा प्रकारची विधाने करण्यापासून परावृत्त करण्याची मागणीही या याचिकेत करण्यात आली होती. या याचिकेसंदर्भात 27 ऑक्टोबर 2021 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने बाबा रामदेव यांना समन्स बजावला होता. आज झालेल्या सुनावणीत त्यांना वादग्रस्त विधाने मागे घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीची 14 इतर उत्पादने बाजारातून परत घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने याआधीच दिलेले आहेत.