नवी दिल्ली
जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले होते. कोरोनामुळे जगभरातील लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, आता आरोग्य संघटनेने एक मोठी घोषणा केली आहे. ज्यात कोरोना हा आजार जागतिक महामारी म्हणून संपल्याचे सांगण्यात आले. कोरोना आता जागतिक आरोग्य आणीबाणीच्या रूपात संपल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीची १५ वी बैठक पार पडली. ‘सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याची घोषणा केली जावी असे मला सांगण्यात आले. मी त्यांचा सल्ला स्वीकारला आहे. म्हणूनच, आता मोठ्या आशेने, मी जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून कोरोनाचा अंत झाल्याचे जाहीर करतो. पण याचा अर्थ कोरोना पूर्णपणे संपला असा होत नाही,’ असे जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस एडनॉम गेब्रेयसस यांनी म्हटले. दरम्यान संघटनेच्या वेबसाईटनुसार कोरोनामुळे लाखो नागरिकांचा मृत्यू झाला. त्यामुळे संघटनेने ३० जानेवारी २०२० रोजी कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून जाहीर केले होते.