सातारा – सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाचा परिसर आज पहाटे भूकंपाने हादरला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू धरणापासून उत्तरेकडे ५ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपामुळे धरणाला कोणताही धोका पोहचला नसल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली.
भूकंपाची खोली जमिनीखाली ३० किलोमीटर इतकी होती. भूकंपाचा सौम्य धक्का केवळ कोयना परिसरातच जाणवला. भूकंपामुळे घराला तडे अथवा पडझड झाली नसल्याची माहिती प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिली. यंदाच्या वर्षाची सुरुवात भूकंपाच्या मालिकेने झाली होती. याआधी माण तालुक्यात २६ फेब्रुवारी रोजी १०:३० वाजता त्यानंतर १:३० वाजता आणि काही वेळात भूकंपाचा तिसरा धक्का बसला होता. यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली होती. भूकंपाच्या मालिकेमुळे १५ घरांना तडे गेले होते. तसेच घरातील भांडीदेखील खाली पडली होती. एकाच दिवसात तीनवेळा भूकंप झाल्यामुळे माणदेशातील नागरिक भयभीत झाले होते.