पाटण – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर कायम राहिला आहे.या धरणात प्रति सेकंद सरासरी २५,५९४ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे धरणाची पाणी साठवण क्षमता संपुष्टात आल्याने कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे दोन फुटांनी उचलण्यात आले.
या धरणातून १९,०९६ व पायथा वीजगृहातून २,१०० असा प्रतिसेकंद २१,१९६ क्युसेक्स विसर्ग पूर्वेकडे कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. या पाण्यामुळे कोयना नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने नदीकाठची गावे व लोकवस्त्यांना सावधानतेचा इशारा कोयना धरणात प्रशासनाने दिला आहे. कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर असून धरणांतर्गत नद्या, नाले,ओढे,धबधबे यातून प्रतिसेकंद सरासरी २५,५९४ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. या धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा झाल्याने यापुढे धरणात ज्या पटीत पाण्याची आवक होईल त्याच पटीत पाणी सोडावे लागणार आहे.