कराड- सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक घराबाहेर पडतात.या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील वासोटा किल्ला वन्यजीव विभागाच्या गाभा क्षेत्रात येत असल्याने या विभागासह कोयना जलाशय परिसरात येण्यास ३० डिसेंबर ते १ जानेवारी या कालावधीत बंदी घालण्यात आली आहे. कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग संस्थांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
निसर्गसंपदेला कोणतीही हानी पोहोचू नये, यासाठी सुरक्षेच्या कारणास्तव उद्या सोमवार ३१ डिसेंबर ते १ जानेवारी या काळात वासोटा किल्ला तसेच अभयारण्यात फिरण्यास बंदी असणार आहे. या काळात वासोटा किल्ला तसेच अभयारण्य परिसरात कोणीही आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बामणोलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी बाठे यांनी दिला आहे.कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बोटिंग संस्थांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत.
थंडीच्या दिवसात पर्यटक, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमी, अभ्यासक मोठ्या संख्येने वासोटा किल्ल्याला भेट देत असतात. या भागात एकीकडे कोयना अभयारण्य असून दुसरीकड व्याघ्र प्रकल्प आहे. सध्या थंडीची चाहूल लागल्याने वासोटा किल्ला पाहण्यासाठी शनिवार, रविवार आणि सुट्टीच्या दिवशी पर्यटक बामणोली, शेंबडी, मुनावळे या संपूर्ण परिसरामध्ये आदल्या दिवशी मुक्कामासाठी गर्दी करत आहेत. तसेच हॉटेल, टेन्ट बुकिंग आठवडाभर अगोदरच फुल होत होते. त्या दृष्टीने प्रशासनाने हा महत्वाचा निर्णय घेतला असून ३ दिवस वासोटा पर्यटकांसाठी बंद राहील.