पुणे- कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीने पुण्याच्या येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज पहाटे घडली. जितेंद्र उर्फ पप्पू शिंदे,असे आत्महत्या केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
जितेंद्र शिंदे येरवडा कारागृहातील सुरक्षा क्रमांक 1 च्या 14 खोलीमध्ये कैद होता. त्याने खोलीच्या दरवाजावरील रॉडला टॉवेल बांधून पहाटे सहाच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली. ही बाब कारागृह कर्मचारी निलेश कांबळे यांच्या लक्षात आली. त्यांनी तातडीने सहकाऱ्यांना बोलावून घेत जितेंद्र शिंदेला खाली उतरवले. तोपर्यंत जितेंद्र शिंदेचा मृत्यू झाला होता.
अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये 13 जुलै 2016 रोजी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन निर्घृण तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी नितीन भैलुमे, जितेंद्र शिंदे आणि संतोष भवाळ या तिघांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी नोव्हेंबर 2017मध्ये तिन्ही आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपची शिक्षा दिली होती.
कोपर्डी हत्याप्रकरणातील आरोपीची कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या
