पणजी – मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्यांना आणि कोकणातील नागरिकांना आता वेगवान व सुलभ प्रवासाची संधी उपलब्ध होणार आहे. गोव्यातील मडगाव ते मुंबई दरम्यान वंदे भारत एक्स्प्रेस ही वेगवान रेल्वे गाडी लवकरच सुरू होणार आहे.पुढील काही दिवसातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या गाडीचे उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे.
ही रेल्वे गाडी भारतीय बनावटीची असून ही आठ डब्यांची गाडी मडगाव स्थानकात दाखलही झाली आहे.मुंबई-मडगाव वंदे भारत एक्स्प्रेसची १६ मे रोजीच चाचणी घेण्यात आली आहे. या गाडीला पंतप्रधान मोदी हे २९ मे रोजी हिरवा बावटा दाखवतील असे सांगण्यात आले होते.पण हा मुहूर्त काही कारणांमुळे टळला असून पुढील काही दिवसांतच या गाडीचे उद्घाटन होईल असे सांगितले जात आहे. मुंबईतील सीएसएमटी येथून ही गाडी सकाळी साडे पाच वाजता मडगावकडे रवाना होणार आहे आणि दुपारी साडेबारा वाजता मडगाव स्थानकात पोहचणार आहे. तसेच हीच गाडी मडगाव येथून दुपारी दीड वाजता मुंबईकडे रवाना होणार असून रात्री साडेआठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहचणार आहे.ही गाडी मंगळवार वगळता सर्व दिवस सुरू राहणार आहे.भारतीय रेल्वेकडून मात्र या वेळापत्रकाला दुजोरा देण्यात आलेला नाही.
परंतु हेच वेळापत्रक लागू होऊ शकते असा दावा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मडगाव दरम्यान सुरू होणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला या मार्गावरील दादर, ठाणे, चिपळूण, रत्नागिरी आणि कुडाळ या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर भारतीय रेल्वे थांबा देणार असल्याचे सांगितले जात आहे.या गाडीची चाचणी घेतली,त्यावेळी ही गाडी सात तासांत मुंबईहून मडगावात दाखल झाली होती.ही गाडी मुंबई, रत्नागिरी,सावंतवाडी आणि मडगाव स्थानकात थांबली होती.या गाडीचा वेग साधारण ८५ ते ९५ किलोमीटर प्रतितास इतका होता