मुंबई : शाळेत मुलांना घरचा डबा पोहोचवण्याचे काम करणार्या डबेवाल्यांना शाळेची सुरक्षा धोक्यात येत असल्याचे कारण देऊन काही कॉन्व्हेंट शाळांनी शाळेत येण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे शाळा प्रशासनांनी हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी मुंबई डबेवाला असोशिएशनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.
दक्षिण मुंबईतील अनेक खाजगी इंग्रजी शाळांनी डबेवाल्यांना शाळेत प्रवेश करण्यास मनाई केली आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत ही बंदी घालण्यात आली आहे. मुंबई डबेवाला असोशिएशनचे सुभाष तळेकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, शाळांनी सुरक्षेबाबत दिलेले कारण खोटे असून शाळा प्रशासन आणि शाळेतील उपहारगृह चालक यांचे संगनमत यामागे आहे.
आता शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांना डबेवाल्यामार्फत घरचा डबा हवा असेल, तर शाळा प्रशासनांनी घेतलेला हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडले पाहिजे, अशी विनंती डबेवाला संघटनेने मुख्यमंत्री व शालेय शिक्षणमंत्री यांच्याकडे केली आहे.