पुणे- क्ष-किरण तंत्रज्ञान, अवकाशयान आणि इलेक्ट्रॉनिकसह अनेक क्षेत्रांना वरदान ठरणारे क्रांतिकारी संशोधन पुण्यातील ‘आयसर’ म्हणजेच राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केले आहे.या शास्त्रज्ञांनी पेरॉक्साईट मटेरियलपासून आपल्या केसापेक्षाही दहापट आकाराने अतिसूक्ष्म असलेले कण म्हणजे नॅनो क्रिस्टल तयार केले आहेत. त्याचा फायदा क्ष- किरण ओळखण्यासाठी होणार आहे. तसेच अवकाशयानात या संशोधनाची भूमिका मोलाची ठरणार आहे.
या संशोधनामुळे क्ष-किरण तंत्रज्ञानाची अचूकता अनेक पटींनी वाढू शकणार आहे. शरीराच्या कोणत्याही भागाचे स्कॅनिंग केले तर तेथे झालेले अतिसूक्ष्म (हेअरलाईन) फ्रॅक्चर, मुका मार स्पष्ट दिसणार आहे. तसेच अंतराळात गेल्यावर शास्त्रज्ञ क्ष-किरणांचा वापर करून तेथील हवा, पाणी, माती यांचे निरीक्षण करतात. त्यासाठी मोठे यंत्र न्यावे लागते. या संशोधनामुळे त्या यंत्राचा आकार अतिसूक्ष्म असा होऊ शकेल. यानाची निर्मिती करतानाही विविध ठिकाणी याचा उपयोग होणार आहे. या संशोधनामुळे सुरक्षा यंत्रणेत विमानतळांवर जे स्कॅनिंग केले जाते ते अधिक स्पष्ट व अतिवेगवान होणार आहे. त्याचप्रमाणे मानवी शरीरासह त्याच्याकडील साहित्यातील सर्वच वस्तूंचे स्पष्ट स्कॅनिंग करण्याची क्षमता वाढणार आहे.