नवी मुंबई – कृषि उत्पादन बाजार समितिमध्ये सोलापूर, कर्नाटक तमिळनाडू आणि अत्यल्प प्रमाणात वसईची केळी दाखल होत असतात. परंतु सध्या अवकाळी पावसामुळे उत्पदनात घट होत असून मोठ्या प्रमाणावर केळींची निर्यात वाढली आहे. त्यामुळे साधी केळी प्रतिडझन १०-२० रुपयांनी तर वेलची केळी ३० ते ४० टक्यांनी वधारली आहेत.
याआधी एपीएमसी बाजारात दररोज १५-२० ट्रक केळींची आवक होत होती. परंतु बाजारात आवक घटली असून अवघ्या ५-६ गाड्या दाखल होत आहेत. घाऊक बाजारात आधी ५० ते ६० रुपये प्रति किलो दराने उपलब्ध असलेली केळी आता ७०-७५ रुपयांनी विक्री होत आहे. तसेच साधी केळी आधी ३०-४० रुपये डझन उपलब्ध होती ती आता ५०-६० रुपयांनी उपलब्ध आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा केळीचे दर खूपच वाढले आहेत. कामगार खर्च, इंधन दरवाढ त्यामुळे दर वाढले असल्याचे घाऊक व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. शिवाय अवकाळी पावसाने उत्पादनाचे नुकसान होत आहे. परिणामी उत्पादन घटले आहे. तसेच दर्जेदार केळींची निर्यात ही दिवसेंदिवस वाढत आहे त्यामुळे ३०-४० टक्के दरवाढ झाली आहे.
केळी महागली! निर्यातीत वाढ