त्रिसुर – केरळ कलामंडलम या अभिमत विद्यापीठात यंदा पहिल्यांदाच एका दलित नृत्य गुरुची भरतनाट्यम साठी सहाय्यक प्राध्यापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लोकशाहीमधील ही सर्वात मोठी घटना समजली जात आहे. विद्यापीठाने पहिल्यांदाच आएलव्ही रामकृष्णन या पुरुष गुरुची भरतनाट्यमसाठी नियुक्ती केली आहे.
यातील महत्त्वाचे म्हणजे रामकृष्णन यांना ते पुरष व दलित असल्याने तसेच त्यांच्या त्वचेच्या रंगामुळे आतापर्यंत अनेकदा नाकारले गेले आहे. रामकृष्णन हे दिवगंत चित्रपट अभिनेता कलाभवन मणी यांचे भाऊ असून त्यांच्याकडे भरतनाट्यम व मोहिनीअटट्म या दोन नृत्यांच्या एमएच्या पदव्या आहेत. पुरुष व दलित असूनही मोहिनीअट्टम नृत्य करत असल्याबद्दल त्यांना आतापर्यंत अनेकदा अपमानाचा सामना करावा लागला. त्यांना कलामंडलम मध्ये आपले नृत्य सादर करण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.
आपल्या नियुक्तीविषयी रामकृष्णन म्हणाले की, माझ्यासाठी हा फार महत्त्वाचा क्षण आहे. माझे बंधू नेहमी सांगायचे की, आपण आपल्या ध्येयाकडे लक्ष दिले पाहिजे व कोणत्याही गोष्टींनी विचलित होता कामा नये. मी या संस्थेच्या इतिहासाचा एक भाग झाल्याचा मला अभिमान वाटतो. या विद्यापीठाचे कुलपती बी. अनंतकृष्णन यांनी म्हटेल आहे की, निवड समितीकडे आलेल्या अर्जांमध्ये रामकृष्णन हे सर्वात योग्य उमेदवार होते. त्यामुळे त्यांची निवड केली आहे. ही एका नव्या प्रवासाची सुरुवात आहे.