तिरुअनंतपुरम
केरळच्या कोझिकोडमध्ये आणखी एक निपाह बाधित रुग्ण आढळल्याने आता निपाह बाधितांची संख्या ६ वर पोहोचली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) निपाह संसर्गाबाबत चिंता व्यक्त केली आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सांगितले की, निपाह विषाणूचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
डॉ. राजीव हे काल पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, आतापर्यंत कोझिकोडमध्ये सहा निपाहचे रुग्ण आढळले आहेत. पहिल्या निपाह संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आल्याने इतरांना त्याची लागण झाली. निपाह संक्रमित रुग्णांमध्ये मृत्यूचा धोका अधिक आहे. निपाह रुग्णांचा मृत्यूदर ४० ते ७० टक्के आहे. कोविड रुग्णांचा मृत्यूदर २ ते ३ टक्के होता. त्याच्या तुलनेत निपाहचा मृत्युदर जास्त आहे.
दरम्यान, काल आणखी एका ३९ वर्षीय व्यक्तीला निपाहची लागण झाल्याचे आढळले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. ही व्यक्ती ३० ऑगस्ट रोजी निपाहमुळे मृत्यूमुखी पावलेल्या रुग्णाच्या संपर्कात आली होती, अशी माहिती आरोग्य राज्यमंत्री कार्यालयाने दिली. शाळा आणि कॉलेजला ऑनलाईन शिक्षणाची परवानगी देण्यात आली आहे.