वायनाड – केरळच्या वायनाड जिल्ह्यातील मुंडक्काई, अट्टामाला आणि चूरमाला या डोंगराळ भागात दरडी कोसळल्याने 117 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत शंभरहून अधिक जण जखमी झाले आहेत. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी इर्शाळवाडी व तळये ही गावे ज्याप्रमाणे दरडीखाली दबली गेली काहीशी तशाच प्रकारची स्थिती याही दुर्घटनेत झाली.
केरळमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू होता. काल रात्री त्यात अधिकच वाढ झाली. डोंगराळ भागातून कोसळणार्या पावसाच्या पाण्याबरोबर मोठ्या प्रमाणात दगड व मातीही वाहून आली. यात अनेक घरे पाण्याबरोबर वाहून गेली. त्यातील लोकांना वाचण्याची संधीही मिळाली नाही. काही घरांवर दरडी कोसळत होत्या. डोंगरातून येणारा पाण्याचा प्रवाह इतका जोरदार होता की, दुर्घटनेनंतर वाहून गेलेले 10 मृतदेह मल्लपूरम जिल्ह्यातील पोथ्थुकल गावातील चालियार नदीत सापडले. या ठिकाणी एनडीआरएफ, लष्कर यांच्यासह राज्य आपत्ती निवारण दलांनी धाव घेतली. मदतकार्य सुरू केले. मात्र पाऊस आणि मुंडक्काई भागाला जोडणारा चुरक्कल येथील पूल वाहून गेल्यामुळे अनेक अडचणी आल्या. हवामान विभागाने रेडअलर्ट दिल्यामुळे हेलिकॉप्टरचाही वापर करता आला नाही. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता रुग्णालय कर्मचारी व आपत्ती व्यवस्थापन दलांनी दिली आहे. डोंगराळ भागातील अनेक गावांमधील घरांवर दरडी कोसळल्या. त्यामुळे मोठी जीवितहानी झाली. या डोंगराळ भागातील अनेक मृतदेह नदीत वाहून आले तर काही चिखलात फसले. रस्त्यांवरही सगळीकडे चिखल व दगडमातीचे ढिगारे आले. त्यामुळे गावातील मदतकार्यात अडथळे आले. निसर्गाचा हा प्रकोप इतका भयानक होता की, जणू या भागात मृत्यूचे तांडव सुरू होते. दुर्घटनेचे स्वरुप पाहता एनडीआरएफ बरोबरच लष्करालाही पाचारण करावे लागले. लष्कराचे 250 जवान बचावकार्यात काम करीत आहेत. लष्कराची वैद्यकीय पथके कोझिकोड कन्नूर इथे तैनात करण्यात आली. तर तमिळनाडूच्या आराकोणम मधूनही एनडीआरएफच्या अतिरिक्त तुकड्या दुर्घटनास्थळी पाठवण्यात आल्या. केरळमध्ये घडलेल्या नैसर्गिक आपत्तीबद्दल राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले. पंतप्रधान सहाय्य निधीतून मृतांच्या कुटुंबाला 2 लाख तर जखमींना 50 हजार रुपयांची मदत घोषित करण्यात आली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही लष्कर प्रमुखांशी चर्चा केली. लष्कराला शक्य ती मदत करण्याचे निर्देश दिले. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी केरळ सरकारला 5 कोटी रुपयांची मदत दिली आहे. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन या सार्या मदतकार्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनी आज व उद्या केरळमध्ये सार्वजनिक दुखवटा जाहीर केला आहे.
केरळच्या वायनाडमध्ये निसर्गाचा प्रकोप दरड कोसळली! 117 ठार! 125 जखमी
