नैरोबी
आफ्रिकेतील केनियाच्या मालिंदी गावात मृतदेह सापडले. ईश्वराला प्रसन्न करण्यासाठी एका ख्रिश्चन धर्मगुरूच्या उपदेशावरून अनेक दिवस उपवास केल्याने अनुयायांनी आपले प्राण गमावले. यातील मृतांचा आकडा ४७ वर पोहोचला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. केनियातील मालिंदी शहराजवळील शाकाहोला परिसरातल्या जंगलामध्ये हे मृतदेह पुरले होते. आतापर्यंत ४७ मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून आणखी मृतदेह मिळण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जाते. या प्रकरणी धर्मगुरू पॉल मॅकेन्झी ठेंगे यांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.
धर्मगुरू पॉल यांनी त्यांच्या अनुयायांना ईश्वरप्राप्तसाठी उपवास करण्यास सांगितले होते. त्यांच्यावर विश्वास ठेवून अनुयायांनी अनेक दिवस उपवास केला. या उपवासामुळे अनेकांचा मृत्यू झाला. शाकाहोला येथील जंगलामध्ये पोलिसांना ५८ थडगी आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता धक्कादायक माहिती समोर आली. धर्मगुरूच्या संदेशावर विश्वास ठेवून केनियाच्या तीन गावातील नागरिकांनी अनेक दिवस उपवास केला. त्यातूनच हे सर्व मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली, त्यानंतर पोलिसांनी ही थडगी उघडून त्यातून मृतदेह काढून ते शवविच्छेदनासाठी पाठवले.