नायरोबी – केनियाच्या मुकुकू गावात ५०० किलो वजनाची धातूची रिंग कोसळली. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. २.५ मीटर व्यासाची ही धातूची रिंग प्रक्षेपण रॉकेटपासून वेगळी होऊन ती मुकुकू गावात कोसळली असल्याचा प्राथमिक अंदाज केनिया स्पेस एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.
ही रिंग जमिनीवर कोसळली तेव्हा खूप गरम आणि लाल रंगाची होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक लोकांना या रिंग जवळ जाण्यास पोलिसांनी मज्जाव केला आणि या रिंगभोवती दोरी लावली. त्यानंतर केनिया स्पेस एजन्सीच्या अधिकाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी रिंगवर संशोधन सुरू केले आणि ही रिंग आपल्या ताब्यात घेतली.