केदारनाथ रोपवेला केंद्राची मंजुरी८ तासांचे अंतर आता ३६ मिनिटांत

डेहराडून- देवभूमी उत्तराखंडमधील
केदरानाथला सोनप्रयागहून
जाण्यासाठी तब्बल ८ ते ९ तास लागतात. आता हा त्रास कमी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत केदारनाथ आणि हेमकुंड रोप-वे योजनेला मान्यता देण्यात आली आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हे या निर्णयाची माहिती देताना म्हणाले की, हा रोप-वे झाल्यानंतर केदारनाथ आणि हेमकुंड साहिबला जाणे सोपे होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय रोप-वे विकास कार्यक्रम-पर्वतमाला परियोजनेनुसार उत्तराखंडमधील सोनप्रयागहून केदारनाथपर्यंत १२.९ किमी अंतराच्या रोपवे योजनेच्या विकासाला मान्यता दिली आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील भागिदारीमधून ही योजना पूर्ण केली जाणार आहे. केदारनाथमध्ये बांधला जाणारा हा रोपवे सर्वात प्रगत ट्राय-केबल डिटेचेबल गोंडोला तंत्रज्ञानावर आधारित असेल. त्यामध्ये रोज १८०० प्रवासी प्रवास करु शकतील. ही योजना केदारनाथ यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी वरदान असेल, कारण त्यांना आरामात ही यात्रा करता येईल. यापूर्वी या मार्गावरील एका मार्गाच्या प्रवासासाठी ८ ते ९ तास लागत होते. आता हा प्रवास जवळपास ३६ मिनिटांमध्ये पूर्ण होईल. गोविंदघाट ते हेमकुंड साहिबजी पर्यंत १२.४ किमी लांबीचा रोप-वे प्रकल्प डिझाईन, बिल्ड, फायनान्स, ऑपरेट आणि ट्रान्सफर माध्यमातून २,७३०.१३ कोटी रुपये भांडवली खर्चासह विकसित केला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top