केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला मुलामा देताना 228 किलो सोने हडपले! शंकराचार्यांचा आरोप

काश्मीर – हिंदू धर्मातील पवित्र चारधामपैकी एक असलेल्या जगप्रसिद्ध केदारनाथ मंदिराच्या गर्भगृहाला सोन्याचा मुलामा देताना 228 किलो सोने लंपास करण्याचा आरोप ज्योतिष पीठचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी केला आहे. हा घोटाळा एकूण 125 कोटींचा असल्याचा अंदाज आहे. काँग्रेसनेही हाच आरोप केला आहे. गर्भगृहाला मुलामा देण्यासाठी वापरलेल्या 230 किलोंपैकी 228 किलो सोने गायब झाल्याचे म्हटले होते. या आरोपानंतर भक्तांमध्ये खळबळ उडाली आहे. उत्तराखंडचे पर्यटन, धार्मिक बाबी आणि सांस्कृतिक मंत्री सतपाल महाराज यांनी सांस्कृतिक आणि धार्मिक खात्याच्या सचिवांच्या नेतृत्वाखील या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे.
गेल्या वर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबरदरम्यान केदारनाथमध्ये सोन्याचा मुलामा चढवण्याचे काम पूर्ण झाले होते. मुंबईतील एका व्यावसायिकाने मंदिर समितीला सोने दान केले होते. त्यानंतर गर्भगृहाच्या भिंती आणि छत यांना सोन्याचा मुलामा देऊन सजवण्यात आले. सोन्याचा मुलामा लावण्याचे काम भारतीय पुरातत्त्व
सर्वेक्षण विभागाच्या दोन अधिकार्‍यांच्या देखरेखीखाली करण्यात आले. सुमारे 19 कारागिरांनी 3 दिवसांत हे काम पूर्ण केले. या कामाच्या वेळी 230 किलो सोने वापरल्याचे सांगितले जात आहे. हेच सोने मोठ्या प्रमाणावर गायब झाल्याचा आरोप आहे.
या आरोपानंतर मंदिराच्या ट्रस्टचे प्रमुख अजेंद्र अजय यांनी सांगितले की, 230 किलो सोने मुलाम्यासाठी वापरल्याची माहिती खोटी आहे. या कामासाठी केवळ 23 किलो सोने वापरण्यात आले आहे. उर्वरित 1,000 किलोच्या तांब्याच्या प्लेटस वापरण्यात आल्या होत्या. काँग्रेस कुठलीही पुरावे आणि माहिती न देता निव्वळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी 230 किलो सोने वापरल्याच्या अफवा पसरवत आहे.
मंत्री सतपाल महाराज यांनीही असा खुलासा केला होता की, सोन्याचा मुलामा देण्यापूर्वी आयआयटी रुरकी, सेंट्रल बिल्डिंग रिसर्च रुरकी आणि पुरातत्त्व खाते यांच्या सहा सदस्यीय टीमने केदारनाथला भेट देऊन गर्भगृहाची पाहणी केली होती. त्यांच्या अहवालानंतरच सोन्याचा मुलामा देण्याचे काम करण्यात आले होते. एका दात्याने सोने विकत घेऊन गर्भगृहाच्या भिंतीवर लावले. मंदिर समितीची यात थेट भूमिका नव्हती. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे बिल व इतर कागदपत्रे देणगीदाराने मंदिर समितीकडे सादर केली. विरोधी पक्ष मुद्दा उपस्थित करून चारधाम यात्रेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सरकारने नेमलेल्या कमिटीत वरिष्ठ सरकारी अधिकार्‍याबरोबर काही सुवर्णकारही आहेत. ही कमिटी सखोल चौकशी करेल.
जून महिन्यात एका ट्विटर हँडलने मंदिराच्या गर्भगृहात सोने पॉलिश होत असतानाचा व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये काही कारागीर गर्भगृहातील सोने पॉलिश करताना दिसत होते. व्हिडिओ बनवणारी व्यक्ती या लोकांना पॉलिश करण्याचे कारण विचारताना दिसली. यासोबतच मंदिर बंद झाल्यानंतर रात्रीच्या वेळी हे काम का केले जात आहे, असा प्रश्नही कारागिरांना
विचारत होती.
हा व्हिडिओ समोर आल्यानंतर खळबळ माजली होती. केदारनाथच्या पुरोहितांनी यावर, सोन्याचा पत्रा वापरला आहे, तर पॉलिश करण्याची गरज काय, असे प्रश्न विचारायला सुरुवात केली. हे पुरोहित आधीपासूनच मंदिराच्या गाभार्‍याला सोन्याचा मुलामा देण्याच्या विरोधात होते. गर्भगृहाच्या भिंतींवर रसायनांचा वापर केला गेला. हे काम छुप्या पद्धतीने केले गेले. त्याची माहिती पुरातत्त्व विभागाला किंवा पुजार्‍यांनाही नव्हती. त्यामुळे आता त्याची चौकशी करा, अशी त्यांची मागणी होती.
या वादावर उत्तराखंडचे माजी मंत्री आणि काँग्रेसचे नवप्रभात म्हणाले की, दानात नेमके किती सोने मिळाले, सोन्यात तांबे का मिसळले, असे अनेक प्रश्न आहेत. केदारनाथमध्येच नाही तर बद्रीनाथमध्येही असा प्रकार घडल्याची माहिती आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top