नवी दिल्ली- दिल्लीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टी आणि भाजपात पोस्टर वॉर सुरू झाले असून भाजपा आपल्या पोस्टरमधून आप सरकारचे घोटाळे दाखवत असताना आम आदमी पार्टीनेही पलटवार करत एक पोस्टर प्रसिद्ध केले. या पोस्टरमध्ये आपचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल झाडू घेऊन पुष्पा चित्रपटातील अभिनेत्याच्या शैलीत उभे असल्याचे दिसून येत आहेत. केजरीवाल झुकणार नाहीत. केजरीवालांचे चौथे सरकार लवकरच येणार असल्याचा मजकूर या पोस्टरवर आहे.
यापूर्वी भाजपाने आम आदमी पार्टी आणि केजरीवाल यांना लक्ष्य करणारे पोस्टर जारी केले होते. त्यामध्ये दिल्लीतील आप सरकारने केलेल्या कथित घोटाळ्याबाबत मजकूर छापला होता.या पोस्टरमध्ये अरविंद केजरीवाल यांचा फोटो होता. हे पोस्टर भाजपाने एक्सवर शेअर केले होते. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिल्लीत विधानसभा निवडणूक होणार आहेत. २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत आपने ७०पैकी ६२जागा जिंकल्या होत्या. भाजपाने फक्त ८ जागा जिंकल्या होत्या, तर काँग्रेसला भोपळा मिळाला होता.