गंगापूर – गंगापूर तालुक्यातील मालुंजा शिवारात काल सकाळी ७ वाजताच्या सुमारास बिबट्या झाडावर चढला होता. ८ तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या जेरबंद झाला. जेरबंद केलेला बिबट्या आठ ते दहा महिन्यांचा असून त्याच्यासोबत मागील काही दिवसांपूर्वी आणखी एक लहान बिबट्या नागरिकांनी पाहिला आहे.
मालुंजा शिवारातील गजानन साळुंके यांच्या शेतामध्ये बिबट्या दिसल्यानंतर कुत्र्यांनी भुंकण्यास सुरुवात केली. बिबट्या झाडावर चढल्याचे एका लहान मुलीने पाहिले. तिने पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर सरपंच जगदीश साळुंके यांच्यासह नागरिकांनी पोलिस व वन विभागाला माहिती दिली. पोलिसांसह वन विभागाची पथके घटनास्थळी दाखल झाली. वन विभागाच्या ३ पथकांनी सलग आठ तास केलेल्या प्रयत्नानंतर दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याला जेरबंद करण्यास यश आले. वन विभागाने त्यांची आईदेखील याच परिसरात असण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन केले.