नवी दिल्ली- दिल्लीतील कथित मद्य धोरण घोटाळ्यातील सीबीआय प्रकरणी आज दिल्लीच्या राऊस अॅव्हेन्यू कोर्टाने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी ११ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. याच प्रकरणात सीबीआयने दाखल केलेल्या चौथ्या आरोपपत्राचीही राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने दखल घेतली. सीबीआयने अरविंद केजरीवाल, दुर्गेश पाठक, विनोद चौहान, आशिष माथूर आणि सरथ रेड्डी यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. या पाच आरोपींना हजर राहण्यासाठी समन्स बजावून ११ सप्टेंबरपर्यंत जबाब नोंदवण्यासाठी मुदत दिली आहे. ही सुनावणी आज विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांच्या न्यायालयात पार पडली.
२७ ऑगस्ट रोजी न्यायालयाने सीबीआयच्या पुरवणी आरोपपत्रावरील निर्णय राखून ठेवला होता. त्यानंतर केजरीवाल तिहार तुरुंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर झाले होते. सीबीआयने १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीची मागणी केली होती, परंतु न्यायालयाने ही कोठडी केवळ एका आठवड्यासाठी म्हणजे ३ सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. मात्र आता पुन्हा १० दिवसांनी म्हणजे ११ सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी वाढवली आहे.