नवी दिल्ली- दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काल भाषणात रामायणाचे उदाहरण देताना चूक केली. मारिच राक्षसाने सुवर्णमृगाचे रुप घेतले असे म्हणण्याऐवजी त्यांनी रावणाने रूप घेतले व सीताहरण केले असे विधान केले. त्यावर भाजपाने नवीन रामायण सुरू केले आहे. केजरीवालांच्या निषेधार्थ भाजपाच्या दिल्ली प्रदेशाध्यक्षांनी लगेच एक दिवसाचे उपोषण केले.
दिल्लीत प्रचारादरम्यान केजरीवाल यांनी सीताहरणाचा प्रसंग सांगितला. भाजपा हे सुवर्णमृगाप्रमाणे असून, त्यांच्या मागे गेलात तर ते तुमचे नुकसान करतील असे केजरीवाल म्हणत होते. मात्र हे सांगताना त्यांचा उल्लेख चुकला. त्यांनी मारिचच्या जागी रावण असा शब्द वापरला. या चुकीने भाजपाच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले. भाजपाने लगेच केजरीवालांवर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. शिक्षण क्षेत्रात अतुलनीय काम करण्याचा दावा करणाऱ्या केजरीवालांकडे साधे रामायणाचेही ज्ञान नसल्याचे भाजपाने म्हटले आहे.
भाजपाचे दिल्ली अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी तर केजरीवालांची ही चूक थेट सनातन धर्माचा अपमान असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, केजरीवाल यांनी सनातन हिंदू धर्माचा घोर अपमान केला आहे. पण या अपमानाबद्दल ते क्षमा मागणार नाहीत त्याची आम्हाला कल्पना आहे. कारण केजरीवाल हे अधर्मी आहेत. त्यामुळे त्यांच्या या पापाबद्दल मीच देवळात जाऊन क्षमा मागणार आहे. त्यासाठी एक दिवसाचा उपवासही करणार आहे. मात्र यापुढे अशा प्रकारे सनातन धर्माचा अपमान सहन केला जाणार नाही.
केजरीवालांकडून भाषणात चूक! भाजपाकडून नवीनच रामायण
