बीड- विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत आज भाजपाच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांनी पवार गटात प्रवेश केला. शरद पवार गटाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी त्यांची निवड झाल्याचे जाहीर करत बजरंग सोनवणे यांनी त्यांच्या प्रवेशाने पक्षाचे बळ निश्चितपणे वाढणार असल्याचे सांगितले.
केज विधानसभा मतदारसंघातून नमिता मुंदडा यांना भाजपाकडून उमेदवारी देण्यात आली. त्यानंतर संगीता ठोंबरे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी त्यांनी केज मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतला आणि त्यांनी शरद पवार गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे त्यांनी थेट भाजपाला आव्हान दिले. त्यानंतर आज त्यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. २०१४ मध्ये संगीता ठोंबरे केज मतदारसंघातून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या. परंतु २०१९ मध्ये त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली होती. आता पुन्हा या निवडणुकीत उमेदवारी नाकारल्याने त्यांनी शरद पवारांची भेट घेतली होती.