नवी दिल्ली- आज १ जूनपासून केंद्रातील मोदी सरकार ऑफर फॉर सेल म्हणजे ओएफएस अंतर्गत कोल इंडिया लिमिटेडमधील तीन टक्क्यांपर्यंत हिस्सेदारी विकणार आहे, अशी माहिती बुधवारी केंद्र सरकारनेच दिली. तसेच ऑफर फॉर सेल १ आणि २ जून रोजी किरकोळ आणि बिगर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी खुली राहील,असेही सरकारने म्हटले आहे.
केंद्र सरकार सध्या कोळसा उत्पादक कंपनीच्या १.५ टक्के समभागासाठी ९.२४ कोटी शेअर्स विकण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.याशिवाय कंपनीकडे अतिरिक्त ९,२४,४०,९२४ (१.५० टक्के) इक्विटी शेअर्स विकण्याचा पर्याय असणार आहे.नियामक फाइलिंगनुसार ओव्हर सबस्क्रिप्शनच्या बाबतीत समान भागभांडवल विकण्यासाठी ग्रीन शू पर्याय असणार आहे.आज व्यापार सत्र बंद झाल्यानंतर कोल इंडियाचा शेअर बीएसईवर २४१.२० रुपये आहे. त्यानुसार तीन टक्के समभागांची किंमत ४४५० कोटी रुपये आहे. ऑफर फॉर सेल हा एक सोपा मार्ग आहे,ज्याद्वारे सार्वजनिक कंपन्यांचे संचालक एक्सचेंज प्लॅटफॉर्मद्वारे शेअर्स विकू शकतात आणि त्यांचे होल्डिंग कमी करू शकतात.