नवी दिल्ली- केंद्र सरकारने पेटीएमसोबत एक महत्त्वाचा करार केला आहे. या करारामुळे पेटीएम कंपनी स्टार्टअप्सना मार्गदर्शन,पायाभूत सुविधांना पाठिंबा, बाजारपेठेत प्रवेश आणि वित्तपुरवठा संधी प्रदान करणार आहे. एका अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली.
डीपीआयआयटीचे संचालक सुमित कुमार जरंगल आणि पेटीएमचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. पेटीएमची मालकी वन ९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडकडे आहे.केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सांगितले की , उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने भारतात नवोपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि उत्पादन आणि फिनटेक स्टार्टअप्सच्या वाढीला गती देण्यासाठी पेटीएमसोबत एक सामंजस्य करार केला आहे.त्यात म्हटले आहे की, “या सहकार्याअंतर्गत, पेटीएम स्टार्टअप्सना मार्गदर्शन,पायाभूत सुविधांना पाठिंबा, बाजारपेठेत प्रवेश आणि निधीच्या संधी प्रदान करेल, त्यामुळे त्यांना व्यवसायाचा विस्तार करण्यास मदत होईल.