नवी दिल्ली – कोलकात्यातील महिला डॉक्टरवरील अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर देशभरातील केंद्र सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या रुग्णालयांमधील सुरक्षा कवच आता आणखी भक्कम केले जाणार आहे. यासंदर्भात सध्या तैनात असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या संख्येमध्ये २५ टक्क्यांनी वाढ करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने परवानगी दिली.
केंद्राने सुरक्षेच्या अनुषंगाने प्रमाणित सुरक्षा संहिता निश्चित केली आहे. आता एखाद्या सरकारी रुग्णालयाने विशेष सुरक्षा रक्षक किंवा मार्शल तैनात करण्याची मागणी केली तर त्यालाही परवानगी दिली जाऊ शकते. यासाठी आधी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल. केवळ कोलकत्यामध्ये घडलेल्या घटनेचा आधार घेऊन केंद्रीय पातळीवर वेगळा कायदा तयार करण्यात आला आहे. मात्र त्यामुळे परिस्थितीत फारसा फरक पडणार नाही असे मत काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. आरजीकार रुग्णालयात घडलेली घटना ही काही प्रत्यक्ष डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील हिंसाचाराशी संबंधित नाही असेही या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सध्या जे कायदे आहेत त्या कायद्याच्या कक्षेमध्ये अन्य गंभीर गुन्हे आणि बलात्काराच्या गुन्ह्याचा समावेश होतो.देशातील २६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी डॉक्टरांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने कायदे तयार केले आहेत. रुग्णालयांना एखाद्या कडेकोट किल्ल्याचे स्वरूप देता येणार नाही.