लॉस एंजलिस – कॅलिफोर्निया येथील लॉस एंजलीस जवळच्या जंगलात लागलेल्या वणव्यातील बळींची संख्या २४ वर पोहोचली असून अद्याप १६ जण बेपत्ता आहेत. आज पोलिसांना एका ६६ वर्षीय वृद्धाचा मृतदेह हाती लागला. हातात होस पाईप असलेल्या अवस्थेत आग विझवण्याच्या प्रयत्नातच त्याचा मृत्यू झाला. जोरदार वाऱ्यांमुळे येत्या दोन दिवसांत हा वणवा अधिक भडकण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.अमेरिकेच्या राष्ट्रीय हवामान विभागाने वेंचुरा आणि लॉस एंजलीसच्या पश्चिमेकडील भागात वणवा पुन्हा भडकण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या भागात रेडअलर्ट जारी केला आहे. शहराच्या अनेक भागात युद्धासारखी स्थिती निर्माण झाली असून सर्वत्र जळलेली घरे व राखेचे ढिग पाहायला मिळत आहेत. या वणव्यावर विमानांमधून अग्निशमन पाणी व रसायने फवारली जात आहेत. कॅलिफोर्नियाच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अनेक कैद्यांनीही अग्निशमन दलात काम सुरु केले आहे. एक हजार महिला व पुरुष कैद्यांनी यात पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांना अतिरिक्त वेतनही दिले जाणार आहे. वणव्यानंतरच्या मदतकार्यात अनेक नागरिकही स्वतःहून पुढे आले आहेत. ही आग विझवण्याच्या कामात ५,००० अग्निशमन दलाच्या जवानांनी भाग घेतला आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम आहे.
कॅलिफोर्नियाच्या वणव्यातील मृतांची संख्या २४ वर! १६ बेपत्ता
