ओटावा- कॅनडातील एडमंटनमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यक्तीची आणि त्याच्या ११ वर्षीय मुलाची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हरप्रीत सिंग उप्पल (४१) असे हत्या झालेल्या शीख व्यक्तीचे नाव आहे. हरप्रीत सिंग उप्पल हा कॅनडातील संघटित गुन्हेगारी क्षेत्रातील कुप्रसिद्ध व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. या हत्तेमुळे कॅनडात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी कॅनडाचे पोलीस अधिक तपास करत आहेत.
हरप्रीत सिंग उप्पल आणि त्यांच्या मुलाला गुरुवारी दुपारी गॅस स्टेशनच्या बाहेर दिवसाढवळ्या गोळ्या घालून ठार करण्यात आले. गोळीबाराच्या वेळी हरप्रीत सिंग उप्पल यांच्या मुलाचा मित्रही गाडीमध्ये होता, मात्र त्याच्या मित्राला या हल्ल्यात कोणतीही दुखापत झाली नाही, असे एडमंटन पोलिस सेवेचे कार्यवाहक अधीक्षक कॉलिन डर्कसेन यांनी शुक्रवारी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. याआधीही कॅनडामध्ये हरदीपसिंग निज्जरची हत्या करण्यात आली होती. पश्चिम कॅनडाच्या ब्रिटीश कोलंबिया प्रांतातील सुर्रे येथील गुरूद्वाराबाहेर दोन अज्ञात हल्लेखोरांनी निज्जरची हत्या केली होती. हरदीप सिंग निज्जर हा बंदी घातलेल्या खालिस्तान टायगर फोर्सचा प्रमुख आणि भारतातील सर्वात वाँटेड दहशतवाद्यांपैकी एक होता.
कॅनडामध्ये शीख व्यक्ती आणि मुलाची गोळ्या झाडून हत्या
