ओटावा- कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पुन्हा एकदा वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. कॅनडाच्या संसदेने हिटलरच्या नाझी सैन्यात सेवा केलेल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ज्यू आणि इतरांच्या सामूहिक हत्येसाठी दोषी ठरलेल्या यारोस्लाव हुंका यांना उभे राहून अभिवादन केले. यावर विरोधी पक्ष नेते पियरे पॉलीव्हेरे यांनी आक्षेप घेतला. तसेच या प्रकरणी ट्रूडो यांनी तत्काळ माफी मागावी, अशी मागणी केली. यानंतर कॅनडा संसदेतील हाऊस स्पीकर अँथनी रोटा यांनी ज्यू समुदायाची माफी मागितली.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेंस्की यांनी २२ सप्टेंबर रोजी कॅनडाचा दौरा केला. यावेळी स्पीकर रोटा यांनी हुंका यांच्याकडे संसदेचे लक्ष वेधले. तेव्हा उपस्थित खासदारांनी उभे राहून त्यांचे स्वागत केले. रोटा यांनी हुंका यांचे वर्णन ‘फर्स्ट युक्रेनियन डिव्हिजन’साठी लढणारा युद्धनायक म्हणून केले. यावर विरोधकांनी जोरदार टीका केली. या प्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागावी, अशी मागणी ज्यू संघटनांनी केली. याबाबत माफी मागताना रोटा यांनी म्हटले की, या व्यक्तीबद्दल मला फारशी माहिती नव्हती. मला माझ्या बोलण्याचा पश्चाताप झाला. मी ज्यू समुदायांची आणि देशातील ज्यूंची माफी मागतो.