- महाराष्ट्रातही तपासणी करण्याची मागणी !
मुंबई – जगभरच्या चॉकलेटप्रेमींमध्ये प्रसिध्द असलेल्या कॅडबरी कंपनीच्या चॉकलेटमध्ये लिस्टरिया व्हायरस आढळून आला असल्याच्या वृत्ताने जगभरात खळबळ उडाली आहे. या व्हायरसच्या भीतीने युकेतील स्टोअर्समधून कॅडबरीची हजारो उत्पादने परत मागवली जात आहेत. हे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर महाराष्ट्रात देखील कॅडबरी उत्पादनाची तपासणी करण्याची मागणी ‘ऑल फूड अँड ड्रग्ज लायसेन्स होल्डर फाऊंडेशन’चे अध्यक्ष अभय पांडे यांनी महाराष्ट्र ‘एफडीए’कडे पत्राद्वारे केली आहे.
या बॅचची उत्पादने खरेदी केली असल्यास ती न खाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याऐवजी ती परत करून पैसे परत घेण्यास सांगण्यात आले आहे. ‘सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल’ म्हणजेच ‘सीडीसी’नुसार, लिस्टेरियाचा संसर्ग अन्नातून पसरणारा असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे होणाऱ्या आजाराला ‘लिस्टेरियोसिस’ असे म्हटले जाते. लिस्टेरिया मोनोसायटोजेन्स बॅक्टेरियाने दूषित अन्न खाल्ल्याने हा आजार होतो. बॅक्टेरिया रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करत असल्याने गर्भवती महिला आणि ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना सर्वात जास्त धोका असतो. ब्रिटनच्या फूड स्टँडर्ड्स एजन्सीने ग्राहकांना त्यांच्या वेबसाइटवर उत्पादनांची एक्सपायरी तारीख तपासण्याचे आवाहनदेखील केले आहे.
एजन्सीने क्रंची, डेम, फ्लेक, डेअरी मिल्क बटन्स आणि डेअरी मिल्क चंक्स, ७५ ग्रॅम चॉकलेट डेझर्ट्सबद्दल अलर्ट जारी केला आहे. क्रंची आणि फ्लेक डेझर्सवर अनुक्रमे १७ आणि १८ मे ते पर्यंत वापरण्याच्या तारखा आहेत. याची माहिती मिळाल्यानंतर सुपरमार्केट चेन मूलर ही प्रॉडक्ट परत मागवत असल्याची माहितीही समोर आली आहे.
लिस्टेरिया मोनोसाइटोजेन्सच्या शक्यतेमुळे म्युलरने विविध कॅडबरी ब्रँडेड डेझर्ट उत्पादनांच्या काही बॅचेस परत मागवल्या आहेत. सावधगिरीचे पाऊल म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती एफएसएने निवेदनाद्वारे दिली. लिस्टरिओसिसची लक्षणे फ्लूसारखीच असतात. यामध्ये ताप, स्नायूंचे दुखणे किंवा वेदना, थंडी वाजून येणे, आजारी असणे किंवा अतिसार यांचा समावेश असल्याचे सीडीसीने म्हटले आहे. लिस्टेरिया संसर्गाचे संकेत आणि लक्षणे संसर्ग झालेली व्यक्ती आणि प्रभावित शरारीनुसार निरनिराळी असू शकतात, असंही आरोग्य यंत्रणेने म्हटले आहे. क्वचित प्रसंगी, संसर्ग अधिक गंभीरदेखील ठरू शकतो. यामुळे मेनिन्जायटिस (मेंदूज्वर)सारख्या समस्या उद्भवू शकतात. गर्भवती महिलेला ‘लिस्टिरियोसिस’ झाला तर गर्भपात होण्याचा धोका असतो, असेही सांगण्यात आले आहे.