नवी दिल्ली- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये वाढलेल्या वजनामुळे पदक मिळवण्याची संधी हुकलेली भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट आज ११ वाजता सकाळी पॅरिसहून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचली. यावेळी तिचे जंगी स्वागत केले. ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया आणि साक्षी मलिकदेखील विनेश फोगाटच्या स्वागतासाठी विमानतळाबाहेर उभे होते. दिल्ली विमानतळ ते विनेशच्या मूळ गाव बलाली (चरखी दादरी जिल्हा) पर्यंत सुमारे १२५ किलोमीटरच्या मार्गावर अनेक ठिकाणी विनेशचे ‘भारत की शेरनी’ अशा घोषणा देत क्रीडाप्रेमींनी तिचे स्वागत केले. हे स्वागत आणि प्रेम पाहून विनेश भावूक झाली होती. तिला अश्रू आवरता आले नाहीत.
ऑलिम्पिकमधील कुस्ती स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली होती. मात्र, १०० ग्रॅम अधिक असल्याचे आढळल्यामुळे तिला अंतिम सामन्यासाठी अपात्र घोषित करण्यात आले. हे प्रकरण क्रीडा लवादाकडे गेले. तिने लवादाकडे रौप्य पदक देण्याची मागणी केली होती. परंतु, अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर तिचे अपील फेटाळले होते. मात्र, तरीही भारतात परतल्यावर आज तिचे जोरदार स्वागत झाले.