कुस्तीगीर परिषद वाद शरद पवारांची हजेरी

पुणे – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची वार्षिक सर्वसाधारण बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या या वादात आता शरद पवार यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे यापुढे बाळासाहेब लांडगे आणि भाजपचे खासदार रामदास तडस यांच्यातील वाद आणखी चिघळणार असल्याची
चिन्हे आहेत.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा वाद सध्या न्यायालयात प्रलंबित आहे. शरद पवार अध्यक्ष आणि बाळासाहेब लांडगे सचिव असलेली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करण्याचा निर्णय ब्रजभुषण सिंग अध्यक्ष असलेल्या भारतीय कुस्ती महासंघाने घेतला. तेव्हा बाळासाहेब लांडगे यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. न्यायालयाने बाळासाहेब लांडगे यांच्या बाजूने निर्णय दिला. याच बाळासाहेब लांडगे गटासोबत शरद पवारांनी आज पुण्यातील वारजे येथे बैठक घेतली. या सर्वसाधारण सभेला जिल्ह्यातील 45 कुस्ती संघाचे अध्यक्ष उपस्थित होते.
भारतीय कुस्ती महासंघाने 30 जून 2022 ला महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या नेतृत्वाखाली नवीन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद अस्तित्वात आली. या परिषदेकडून पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात आले. दरम्यानच्या काळात बाळासाहेब लांडगे यांनी भारतीय कुस्ती महासंघाच्या निर्णयाला न्यायालयात आवाहन दिले होते.
न्यायालयाने बाळासाहेब लांडगे सचिव असलेल्या कुस्तीगीर परिषदेच्या बरखास्तीला स्थगिती दिली आहे. त्यामुळे बाळासाहेब लांडगे आणि शरद पवार गटाकडून राज्यातील सर्व जिल्हा कुस्तीगीर संघांना बैठकीसाठी बोलावण्यात आले. वादाच्या पार्श्वभूमीवर पुढे कोणती भूमिका घ्यायची हे या बैठकीत ठरल्याचे समजते. दुसरीकडे बाळासाहेब लांडगे गटाने आयोजित केलेल्या स्पर्धांमधे सहभागी होणार्‍या जिल्हा कुस्ती संघांवर कारवाई करण्याचा इशारा भारतीय कुस्ती महासंघाने मागे दिला होता. मात्र न्यायालयाने कारवाईला स्थगिती दिल्याने आजच्या बैठकीत राज्यभरातील जिल्हा कुस्ती संघांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले.
शरद पवारांनी या वादात सक्रिय भूमिका घ्यायचे ठरवले असल्याचे आजच्या बैठकीतून स्पष्ट झाले. त्यामुळे कुस्तीगीर परिषदेचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top