जम्मू – जम्मू – काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील मच्छल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एका मेजरसह ५ भारतीय जवान जखमी झाले. या कारवाईदरम्यान एका पाकिस्तानी दहशतवाद्याला ठार करण्यात सैन्य दलाला यश आले. या चकमकीत एक जवान शहीद झाला.
जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यात मच्छल सेक्टरमध्ये दहशतवादी लपले असल्याची माहिती सैन्य दलाला मिळाली. या माहितीच्या आधारे सैन्य दल पोहचले असता भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. पाकिस्तानच्या बॉर्डर ॲक्शन टीमने भारतीय सैन्य दलावर हल्ला केला. या हल्ल्याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले. यादरम्यान एक जवान शहीद झाला, तर मेजर रँकच्या अधिकाऱ्यासह ४ जण जखमी झाले. भारतीय सैन्य दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ठार झालेला आतंकवादी पाकिस्तानी आहे. जखमी जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
भारत पाक सीमेवर बॉर्डर ॲक्शन टीम कडून भारतीय जवानांवर हल्ले केले जातात. पाकिस्तानी बॉर्डर ॲक्शन टीम लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोलमध्ये नेहमीच घुसखोरी करते. या टीममध्ये पाकिस्तानी लष्कराचे कमांडो आणि दहशतवाद्यांचा सहभाग असतो. कुपवाडा मच्छल सेक्टरमध्ये झालेला दहशतवादी हल्ला यापैकी एक होता. २४ जुलै रोजी अशीच एक चकमक कुपवाडा येथे झाली. या चकमकीत एक दिलवर खान हा जवान शहीद झाला. भारतीय सैन्य दलाने काही दिवस आधीपासून कुपवाडाच्या लोलब विभागात आतंकवादी विरोधी अभियान सुरु केले.