भोपाळ
मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानातील चित्त्यांपैकी एकाचा रविवारी मृत्यू झाला. उदय असे त्याचे नाव होते. हा चित्ता सहा वर्षांचा होता. रविवारी सकाळी पाहणीदरम्यान तो निश्चल अवस्थेत आढळल्यानंतर त्याची माहिती पशुवैद्यकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली. त्याला उपचारासाठी मोठय़ा क्षेत्रातून बाहेर काढण्यात आले. मात्र, दुपारी ४ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे शवविच्छेदनानंतर स्पष्ट होईल, असे प्रधान मुख्य वनसंरक्षक जे. एस. चौहान यांनी सांगितले.
नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून भारतात आणलेल्या २० चित्त्यांपैकी आता १८ चित्ते उरले आहेत. नामिबियातून आणलेल्या आठ चित्त्यांना गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाढदिवसानिमित्त कुनो उद्यानात सोडण्यात आले होते. यातील मादी साशाचा २७ मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजाराने मृत्यू झाला. ती कुनो उद्यानात सोडलेल्या चित्यांच्या पहिल्या तुकडीतील होती. दरम्यान, कुनो येथे महिनाभरात दुसऱ्यांदा चित्ता दगावण्याची घटना घडली आहे.