कुनो
नामिबियातून मध्य प्रदेशच्या कुनो अभयारण्यात आणलेला नर चित्ता पळाल्याची घटना शनिवारी घडली. त्याचे नाव ओबान असे आहे. हा चित्ता विजयपूर भागातील बडौदा व गोलीपुरा या भागात फिरत आहे. चित्ता त्याच्या हद्दीतून बाहेर आल्याने तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या चित्त्याला पुन्हा त्याच्या हद्दीत सोडण्यासाठी वन विभागाने जोरदार शोधमोहीम हाती घेतली आहे.
या चित्त्यामुळे गावात मोठी दहशत पसरली आहे, तर आजूबाजूच्या गावातील हजारो नागरिक चित्ता बघायला गोलीपुरा भागात आले आहेत. त्यामुळे बचावकार्यात अडचणी निर्माण होत आहेत. शनिवारी रात्री ओबान चित्ता कुनो नॅशनल पार्कमधून पळाला. त्याच्या गळ्यात कॉलर आयडी लावण्यात आला आहे. त्याच्या सहाय्याने लोकेशन बघणे सोप्पे झाले आहे. त्यानुसार त्याचे शेवटचे लोकेशन बडौदा गावात मिळाले आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये १९ चित्त्यांवर २४ तास नजर ठेवली जात असतानाही ओबान पळाल्याने अभयारण्याच्या व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा उघड झाला आहे.