कुडाळ : कुडाळ आगाराच्या नियोजनशून्य आणि भोंगळ कारभाराचा फटका काल पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांना बसला. कंडक्टर नसल्याने रविवारी सकाळी ६.४५ वाजता सुटणारी कुडाळ पुणे फेरी रद्द करण्यात आली. आरक्षण करून सुद्धा ऐन हंगामातील रोजची फेरी रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय झाली. प्रवाशांनी कुडाळ एसटी आगारच्या भोंगळ कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला.कुडाळ आगाराचे खासगी बस चालकांशी संधान असल्याने पुणे बस नेहमीच रद्द केली जाते असा संशय काही प्रवाशांनी यावेळी व्यक्त केला. कुडाळ-पुणे बस सकाळी ६.४५ वाजता कुडाळ वरून सुटते. त्यामुळे अगदी ६.१५ वाजल्यापासूनच प्रवासी कुडाळ बसस्थानकात येऊन थांबले होते. पण बसचा वेळ होऊन देखील बस फलाटाला लागली नसल्याने प्रवाशात चलबिचल सुरू झाली. अखेर काही प्रवाशांनी वाहतूक नियंत्रक कक्ष गाठत चौकशी केली असता वाहतूक नियंत्रकानी ड्रायव्हर आहे पण कंडक्टर उपलब्ध नसल्याने कुडाळ-पुणे फेरी रद्द केली असल्याचे सांगितले.
कुडाळ आगाराची लांब तसेच स्थानिक भागातील बस सेवा नेहमीच रामभरोसे झाली आहे. आगार व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याचे नेहमीच दिसून येते. त्यानंतर सारे प्रवासी ८ वाजता येणाऱ्या पणजी पुणे गाडीची वाट बघत थांबले. पण ती गाडी सुद्धा ९.३० नंतर आली. त्या गाडीत प्रचंड गर्दी होती, त्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली.