कुडाळ – तालुक्यातील बांव-बागवाडी येथील कर्ली नदीपात्रात मासेमारीसाठी गेलेल्या ४२ वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. राजाराम अशोक परब (४२) असे या मृत तरुणाचे नाव असून तो बांबुळी खालचीवाडी येथील रहिवासी होता. ही दुर्घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. बांव-बागवाडी येथील रेल्वे पुलाखाली काल दुपारी त्यांचा मृतदेह आढळून आला.
राजाराम परब,सुधीर बावकर, नारायण राऊत (दोन्ही रा. बाव) व संतोष वरक (रा. बांबुळी) असे चौघेजण बांव-बागवाडी रेल्वे ब्रीजखाली कर्ली नदीपात्रात मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी सुधीर बावकर व नारायण राऊत या दोघांनी लहान फायबर होडीत बसून पाण्यात जाळे टाकले होते. तर संतोष वरक व राजाराम परब हे दोघे नदीकिनारी बसले होते. दरम्यान,राजाराम परब यांच्या हातापायाला वाळू लागल्याने ती धुण्यासाठी ते पाण्यात उतरले. त्यावेळी नदीकिनारी असलेल्या शेवाळावरून त्यांचा पाय घसरून ते खोल डोहात पडले आणि वेळातच ते दिसेनासे झाले. त्यानंतर सुधीर बावकर व नारायण राऊत यांनी होडीतून त्यांचा नदीपात्रात शोध घेतला. परंतु ते सापडले नाहीत. त्यानंतर या घटनेची माहिती त्यांनी कुडाळ पोलिस शोध घेत असताना काल दुपारी कर्ली नदीपात्रात राजाराम परब यांचा मृतदेह सापडला.