नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात”द्वारे देशवासियांशी संवाद साधतात. पण शेवटच्या रविवारी प्रजासत्ताक दिन असल्याने यावेळी नव्या वर्षातील ‘मन की बात’ कार्यक्रमाचा पहिला आणि एकूण ११८ वा भाग आज एक आठवडा आधीच प्रसारित झाला. यात पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिन आणि प्रयागराजमध्ये होत असलेल्या कुंभमेळ्याबद्दल भाष्य केले.
ते म्हणाले की,यंदाचा प्रजासत्ताक दिन खास आहे. देशात संविधान लागू होऊन ७५ वर्षे होत आहेत. त्यामुळे ७५ वा प्रजासत्ताक दिन खास ठरतो. या निमित्ताने संविधान सेभेतील सर्व महापुरुषांना मी वंदन करतो. ज्यांनी देशाला पवित्र संविधान दिले, असे मोदींनी म्हटले आहे.
पुढे कुंभमेळ्याबद्दल ते म्हणाले की, महाकुंभमेळ्याला सुरुवात झाली आहे. हजारो वर्षांपासून चालत आलेल्या या परंपरेत कुठेही भेदभाव किंवा जातीवाद नाही. भारताच्या दक्षिण, पूर्व आणि पश्चिम भारतातून लोक येथे येतात. कुंभमध्ये श्रीमंत आणि गरीब दोघेही एकत्र येतात. प्रयागराज, उज्जैन, नाशिक आणि हरिद्वार येथे कुंभाचे आयोजन केले जाते, त्याचप्रमाणे दक्षिणेकडील प्रदेशात गोदावरी, कृष्णा, नर्मदा आणि कावेरी नद्यांच्या काठावर पुष्करमांचे आयोजन केले जाते. तर कुंभकोणम ते तिरुक्कड-युर, कूड-वासल ते तिरुचेराई अशी अनेक मंदिरे आहेत, ज्यांच्या परंपरा कुंभाशी संबंधित आहेत. ‘कुंभ’, ‘पुष्करम’ आणि ‘गंगा सागर मेळावे’ हे सण म्हणजे आपला सामाजिक संवाद, सौहार्द आणि एकात्मता वाढवणारे सण आहेत.