भोपाळ – उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे होणार्या कुंभमेळ्यासाठी भोपाळमध्ये तयार करण्यात आलेली फायर फायटिंग बोट प्रयागराजला रवाना झाली आहे. ही देशातील पहिली फायर फायटिंग बोट आहे.
महाकुंभमेळ्यादरम्यान प्रयागराज येथील घाटावर ही बोट तैनात असेल. नदीच्या पात्रात स्नान करतेवेळी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती ओढावल्यास ही विशेष फायर फायटिंग बोट आपले कर्तव्य बजावणार आहे. आगीसारख्या घटनेत तत्काळ बचावकार्य करता येणार आहे. या बोटीच्या तपासणीनंतर पहिली बोट ही प्रयागराजसाठी रवाना झाली आहे. यानंतर पुढील ८ ते १० दिवसांत उर्वरित ५ बोटी प्रयागराजला रवाना करण्यात येणार आहेत. फायर फायटिंग बोटीचे बांधकाम उत्तरप्रदेश अग्निशमन सेवेच्यावतीने निविदा जारी करून करण्यात आले आहे. या बोटीच्या बांधकामाचे काम भोपाळच्या पीएस ट्रेडर्स कंपनीला देण्यात आले होते. या बोटीची निर्मिती खास करून कुंभ मेळ्यासाठी करण्यात आली आहे.या बोटीत एका वेळेस कर्मचार्याव्यतिरिक्त १० माणसांची बसायची सुविधा आहे. या बोटीची मोटार डिझेलवर चालणारी आहे. पण बोटीत पेट्रोलसाठी वेगळी टाकी आहे.