प्रयागराज- प्रयागराजच्या संगमावर स्नान करण्यासाठी मौनी अमावास्येला लाखो भक्तांची गर्दी उसळली होती. यावेळी झालेल्या चेंगराचेंगरीत अनेकांनी प्राण गमविले. याबाबत योगी प्रशासनाला जबाबदार धरले जात आहे. ही टीका होत असताना चेंगराचेंगरीत किती जणांचा मृत्यू झाला त्याचा अधिकृत आकडा योगी सरकारने काल जाहीर केला. हा अधिकृत आकडा 30 असला तरी विविध राज्यांमध्ये पाठविलेल्या भक्तांच्या पार्थिवांची गणना केली तर तो आकडा 44 पर्यंत जातो. यामुळे योगी सरकार पुन्हा एकदा लपवाछपवी करीत आहे, असा संशय निर्माण झाला आहे. कोरोना काळात महाराष्ट्रात सर्वाधिक मृत्यू झाले असे सांगून उद्धव ठाकरेंच्या मविआ सरकारला सातत्याने धारेवर धरण्याचा प्रयत्न सुरू होता. यावेळी उत्तर प्रदेशात कितीतरी अधिक पटीने कोरोनाचे मृत्यू झाले, अशी चर्चा होती. कोरोनात मृत्यू झालेल्यांपैकी अनेकांचे मृतदेह गंगा नदीत आढळले होते. याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर योगी सरकार अडचणीत आले आणि त्यांनी घाईने हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच महाराष्ट्रापेक्षा उत्तर प्रदेशात कोरोनाचे बळी अधिक गेले अशी जवळजवळ खात्री झाली होती. कोरोनाच्या काळात योगी सरकारने ज्याप्रमाणे मृतांच्या आकड्यांची लपवाछपवी केली त्याचप्रमाणे आता चेंगराचेंगरीत दुर्दैवी मृत्यू झालेल्यांच्या संख्येबाबत योगी सरकार लपवाछपवी करत आहे, असा विरोधकांचा आरोप आहे.
उत्तर प्रदेश सरकारने अजून मृतांची यादीच जाहीर केलेली नाही. तर वेगवेगळ्या राज्यांनी दिलेली आकडेवारी 44 इतकी आहे. उर्वरित मृत्यू वेगवेगळ्या इतर कारणाने झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मृतांची संख्या नेमकी किती याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कुंभमेळा अधिकारी विजय किरण म्हणाले, 30 भाविक मृत्युमुखी पडले आहेत. त्यातील 25 मृतांची ओळख पटली आहे, तर 90 जण जखमी झाले आहेत.
प्रशासन ही माहिती देत असले तरी दुर्घटनेच्या दिवसानंतर प्रयागराजमधून वेगवेगळ्या राज्यांत 44 मृतदेह पाठवण्यात आल्याची नोंद आहे. उत्तर प्रदेशातील 8 जिल्ह्यांत 16, बिहारमध्ये 8, कर्नाटकात 4, हरियाणा-राजस्थानमध्ये प्रत्येकी 3, झारखंड व बंगालमध्ये 2-2, आसाम, गुजरात, उत्तरखंडमध्ये प्रत्येकी 1 मृतदेह पाठवण्यात आला आहे. पण बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आपल्या राज्यातील 11 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगून त्यांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळे या चेंगराचेंगरीचे गूढ अजूनही कायम आहे.
मौनी अमावास्येला झालेल्या चेंगराचेंगरीचा तपास उत्तर प्रदेश पोलिसांचा स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) करत आहे. या दुर्घटनेमागे एखादे कटकारस्थान होते काय, याचाही तपास हे पथक करत आहे. यासाठी एसटीएफ या परिसरात सक्रिय असलेल्या मोबाईल नंबरचा तपशील तपासत आहे. आतापर्यंत 16,000 मोबाईल क्रमांकांचा डेटा तपासण्यात आला आहे. यातील अनेक मोबाईल क्रमांक चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर बंद झाले आहेत. त्यांची चौकशी करण्यात येणार आहे. तर सीसीटीव्ही चित्रणाद्वारे संशयितांचे चेहरे तपासले जाणार आहेत.
दरम्यान, वसंत पंचमीच्या मुहुर्तावर उद्या कुंभमेळ्यात तिसरे अमृत स्नान होणार आहे. या अमृतस्नानाचा ब्रह्म मुहूर्त सकाळी 5.23 ते 6.16 दरम्यान असणार आहे. मौनी अमावास्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या अमृत स्नान पर्वात भाविकांच्या सुरक्षेसाठी प्रयागराज प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. त्यानुसार संगम तटावर 28 मोक्याची ठिकाणे बनविण्यात आली आहेत. या स्नानासाठी काली मार्ग, धरण आणि संगमकडे जाणाऱ्या रस्त्यांसह मेळा परिसरातील मुख्य रस्त्यांवर भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. या ठिकाणी विशेष काळजी घेतली जाणार आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजचा दौरा घेऊन या अमृतस्नानाच्या तयारीचा आढावा घेतला. योगी अधिकाऱ्यांसह जिथे चेंगराचेंगरी झाली तिथे गेले. दुर्घटना कशी झाली, असे त्यांनी अधिकाऱ्यांना विचारले. त्यांनी बचावकार्याचीही माहिती घेतली. योगी यांनी चेंगराचेंगरीबाबत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. अशा घटनेच्या पुनरावृत्तीसाठी रोखण्यासाठी पावले उचलण्यास आणि भाविकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर देत व्यवस्था अधिक कडक करण्यास सांगितले.
तिसऱ्या अमृतस्नानाच्या दिवशी भाविकांच्या सुरक्षेच्या बाबतीत कुठलीही चूक होऊ नये, जिथे तक्रारी आहेत, तिथे अधिकाऱ्यांनी स्वतः जाऊन त्या सोडवाव्यात. महाकुंभमेळा परिसरातील पार्किंगची जागा वाढवा. भाविकांना शक्य तितके कमी चालावे लागेल, अशी व्यवस्था करा. महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक व्यवस्थापनाची जबाबदारी सुनिश्चित करा. कुठेही वाहतूक कोंडी होऊ देऊ नका. वसंत पंचमीला पूर्व उत्तर प्रदेश, बिहार आणि नेपाळमधून मोठ्या संख्येने भाविक येतील. हे लक्षात घेऊन व्यवस्था करावी अशा सूचना देत चेंगराचेंगरी प्रकरणी जबाबदार असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्वोच्च न्यायालयात आज महाकुंभ
चेंगराचेंगरी प्रकरणावर सुनावणी
महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरी झाल्या प्रकरणी उद्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. या प्रकरणी वकील विशाल तिवारी यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. मुख्य न्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठासमोर जनहित याचिकेवर सुनावणी पार पडेल.
कुंभमेळ्यात 41 जणांचा मृत्यू! योगी सरकारची पुन्हा लपवाछपवी
