कीर्तिकरांनी शिंदे गटाची नाराजी उघड केली भाजपची सापत्न वागणूक! कामे होत नाहीत

मुंबई – राज्यात सत्तेसाठी एकत्र आलेल्या शिंदे गट आणि भाजप यांच्यात वरवर सगळे चांगले चालल्याचे चित्र दिसत असले तरी महायुतीत आतल्या आत धुसफूस असल्याचे बोलले जात असतानाच आज शिंदे गटाचे ज्येष्ठ खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटाला वाटणारी खंत उघडच केली. भाजपकडून शिंदे गटाच्या 13 खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याची खंत गजानन कीर्तिकर यांनी बोलून दाखवली. आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गट 22 जागा लढवणारच असेही ते म्हणाले. यामुळे लोकसभा सीट वाटपावेळी महायुतीत सगळे काही आलबेल नसेल, अशी चिन्हे दिसत आहेत.
आज पत्रकारांशी बोलताना गजानन कीर्तिकर म्हणाले की, आम्ही 13 खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो. त्यामुळे आता आमचा पक्ष शिवसेना हा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक झाला आहे. त्यामुळे एनडीएचा घटकपक्ष असल्याप्रमाणे आमची कामे झाली पाहिजेत. पण आमची कामे होत नाहीत. मी हा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या खासदारांच्या बैठकीत मांडला. भाजपकडून आम्हाला घटकपक्षाचा दर्जा मिळाला पाहिजे. त्याप्रमाणे आम्हाला वागवले गेले पाहिजे. पण भाजपकडून आम्हाला सापत्न वागणूक मिळते आहे.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावरूनही गजानन कीर्तिकर यांनी भाजपची चिंता वाढवणारे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, लोकसभेच्या 22 जागा आमच्याच आहेत, त्यामुळे या जागांवर वेगळा दावा करायचा प्रश्नच येत नाही. 2019 साली शिवसेना आणि भाजप एकत्र असताना जागावाटप झाले तेव्हा आम्ही 22 तर भाजपने 26 जागा लढवल्या. यापैकी 22 जागांवर भाजपचे आणि 18 जागांवर आमचे खासदार निवडून आले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत हेच सूत्र राहील. त्यादृष्टीने आमची तयारी सुरू झाली आहे. कीर्तिकरांचा दावा गंभीर असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या मुद्यावरून महाविकास आघाडीप्रमाणे भाजप-शिंदे गटातही वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण शिंदे गटाने लोकसभेच्या 22 जागांची मागणी भाजपला कितपत मान्य होईल, हा प्रश्नच आहे. यावर भाजपच्या नेत्यांनी थेट उत्तर दिले नसले, तरी शिवसेना आणि आमच्यात वाद नसल्याची सारवासारव केली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दोन्ही पक्षांत वाद नाही. वाद असले तरी वादळ नाही. दोन्ही पक्षांत कुठलेही मतभेद नाहीत. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की, जागावाटपाचा फॉर्म्युला अजून ठरलेला नाही. शिवसेनेला सन्माननीय जागा दिल्या जातील. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर बसून हा प्रश्न सोडवू. आम्ही सध्या दोन पक्ष मिळून एकत्रच विचार करतो आहे. मात्र सर्वात महत्वाचा प्रश्न हा आहे की कीर्तिकरांनी नाराजी उघडपणे का सांगितली? हे सांगण्यामागे शिंदे गटाचे दबावतंत्र आहे की कीर्तिकरांच्या मनातील खदखद आहे हे आगामी काळात
उघड होईलच.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top