सेऊल :रशियाच्या दौऱ्यावर असलेले उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी नुकत्याच झालेल्या शिखर परिषदेनंतर आज, शुक्रवारी लढाऊ विमान (फायटर जेट प्लांट) कारखान्याला भेट दिली. पुतीन यांना स्पेसपोर्टवर भेटल्यानंतर दोन दिवसांनी, किम यांची बुलेट-प्रूफ ट्रेन कोमसोमोल्स्क-ऑन-अमुर येथे आज आल्याचे रशियन वृत्तसंस्थांनी सांगितले.
नागरी आणि लष्करी लढाऊ विमान कारखान्याला भेट देण्यासाठी किम हे रशियाचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असलेल्या शहरात पोहोचले. आरआयए नोवोस्ती या वृत्तसंस्थेने किमची ट्रेन शहरात आल्याचे फुटेज देखील प्रकाशित केले. त्याच्या स्वागतासाठी रेड कार्पेट अंथरले होते. क्वचितच आपला देश सोडणाऱ्या किम यांनी बुधवारी व्होस्टोचनी कॉस्मोड्रोम येथे पुतीन यांच्याशी चर्चा केली होती. त्याचवेळी पुतिन यांनी किम कोमसोमोल्स्क-ऑन-अमुर येथे जेथे नागरी आणि लढाऊ विमान वाहतूक उपकरणे तयार केली जातात त्या कारखान्यांना भेट देणार असल्याचे सांगितले होते.
विशेष म्हणजे रशिया आणि उत्तर कोरिया हे दोघेही जागतिक निर्बंधांच्या तडाख्यात आहेत. या कारखान्यात रशियाच्या सुखोई एसयू -३५ आणि एसयू-५७ लढाऊ विमानांची निर्मिती केली जाते. त्यामुळे उत्तर कोरियाला त्याचा क्षेपणास्त्र कार्यक्रम विकसित करण्यासाठी मॉस्कोची मदत हवी आहे. तर तर यूक्रेनविरुद्ध युद्धात वापरण्यासाठी रशियाला उत्तर कोरियाचा दारुगोळा खरेदी करण्यात रस असल्याचे अमेरिकन अधिकारी आणि तज्ञांनी म्हटले आहे. किमची भेट आणखी काही दिवस चालेल, असे क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी अधिक तपशील न देता हे जाहीर केले.