वॉशिंग्टन – अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून एकापाठोपाठ एक घेतलेल्या धडाकेबाज निर्णयांमुळे चर्चेत असलेले डोनाल्ड ट्रम्प आता उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन यांचे कौतुक केल्यामुळे चर्चेचा विषय बनले आहेत. किम जोंग हे बुद्धिमान नेते आहेत, असे ट्रम्प एका कार्यक्रमादरम्यान बोलताना म्हणाले.किम जोंग उन हे बुद्धिमान आणि समजुतदार नेते आहेत. त्यांना भेटण्याची मला इच्छा आहे. त्यांच्याशी संबंध अधिक मैत्रिपूर्ण व्हावेत यासाठी मी प्रयत्न करेन, असे ट्रम्प म्हणाले.ट्रम्प यांच्या या भूमिकेला त्यांच्याच रिपब्लिकन पार्टीतील अनेक नेत्यांचा विरोध आहे. किम जोंग हा हुकूमशहा आहे, त्याच्याशी लोकशाही मानणाऱ्या अमेरिकेने चर्चा करण्यात काहीही अर्थ नाही, असे या नेत्यांचे ठाम म्हणणे आहे. दुसरीकडे किम उन याचा कट्टर शत्रू असलेला दक्षिण कोरिया हा देश अमेरिकेचा मित्र आहे. त्यामुळे अमेरिकेने किम जोंगशी संबंध सुधारण्याचा प्रयत्न केल्यास दक्षिण कोरियाच्या रोषाला अमेरिकेला सामोरे जावे लागेल. या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांच्या या वक्तव्यावर उलटसुलट चर्चा होत आहे.
किम जोंग उन बुद्धिमान नेता ट्रम्प यांच्या वक्तव्याची चर्चा
