सातारा – जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वर तालुक्यात मांघर हे गाव देशातील पहिले मधाचे गाव म्हणून ओळखले जाते.पण आता याच मांघरमध्ये मधपोळ्याला मेनकिडा, तर मधमाशांना अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे महाबळेश्वरसह जिल्ह्यातील सर्व मधपाळ संकटात आले आहेत. या रोगांमुळे मध उत्पादनात घट झाल्याने मधपाळ शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.
जिल्ह्यातील महाबळेश्वर, वाई,पाटण,जावली तालुक्यात मधमाशीपालन व्यवसाय गेल्या ७० वर्षांपासून सुरू आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षी खादी ग्रामोद्योग विभागाने देशातील पहिले मधाचे गाव महाबळेश्वर तालुक्यातील मांघरला मान्यता दिली.मांघर गावातील एकूण लोकसंख्येच्या ९० टक्के लोक हे मधमाशी पालन करतात.त्यातून त्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळाला आहे. मात्र सध्या ऋतुचक्र बदलल्याने या परिसरातील मधमाशांना अमेरिकन फ्राऊलब्रुड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. या रोगामुळे मधमाशा पोळ्यातच मृत्यूमूखी पडत आहेत. मधपोळ्यालाही मेनकिडा लागला आहे. दर सात वर्षांनी कारवी वनस्पती फुलत असते. मात्र या वनस्पतीला फुले आल्यानंतरही पावसाने उघडीप घेतली नव्हती त्यामुळे मधाचे उत्पादनही घटले असल्याचे मधपाळ शेतकरी सांगत आहेत. आता याबाबत महाबळेश्वर येथील मधसंचालनालय अधिकारी मांघर येथे भेट देऊन वसाहतीची पाहणी करणार आहेत.