श्रीनगर – थंडीच्या लाटेमुळे गेल्या काही दिवसांपासून जम्मू काश्मीर जोरदार बर्फवृष्टी सुरु असून अनेक राज्यात येत्या काही दिवसात पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काल दिल्ली-एनसीआरमध्ये हलका पाऊस झाल्याने आजपासून पुन्हा थंडी वाढली आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात ४ अंशांनी तर कमाल तापमानात ७७ अंशांनी घसरण होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. हवामान खात्याने, पंजाब, हरियाणा, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तर राजस्थानमध्ये पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, बंगाल आणि ओडिशामध्ये दाट धुके असेल.
जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश च्या डोंगराळ भागात सलग चार दिवस बर्फवृष्टी झाली. हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्येही पाऊस पडत आहे. हिमाचलमधील ५ जिल्ह्यांमध्ये २८ जानेवारीपर्यंत धुके आणि थंडीच्या लाटेचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीरमधील गुलमर्ग, सोनमर्ग, झोजिला पास यासारख्या उंच भागात बर्फवृष्टीमुळे गुरेझ-बांदीपोरा रोड, सेमथान-किश्तवार, मुगल रोड मंगळवारी बंद करण्यात आला. उत्तर प्रदेशातील ४० जिल्ह्यांमध्ये दाट धुक्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातील पर्यटकांची संख्याही घटली आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सच्या प्रभावामुळे जयपूर, अलवर, सीकरसह काही जिल्ह्यांमध्ये ढग दाटून आले होते, मात्र पाऊस पडला नाही. राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता असून गंगानगर, हनुमानगड, चुरू, झुंझुनू, सीकर, नागौर, जयपूर, अलवर, भरतपूर, दौसा आणि धौलपूर जिल्ह्यात दाट धुक्याचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. नोएडा आणि मथुरामध्ये जोरदार पाऊस झाला. गाझियाबादमध्ये सकाळी रिमझिम पाऊस झाला.