मुंबई- केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ‘मेरा युवा भारत : वतन को जानो’ कार्यक्रमांतर्गत मुंबई भेटीवर आलेल्या काश्मीरच्या १२५ युवक युवतींनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची शुक्रवारी (दि. २९) राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांचेशी संवाद साधला. नेहरू युवा केंद्र संघटन संस्थेतर्फे या मुंबई भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्रीनगर, अनंतनाग, कुपवाडा, बारामुल्ला, बडगाम व पहलगाम या जिल्ह्यातील युवक युवतींनी राज्यपालांशी प्रश्नोत्तर रूपाने संवाद साधला. कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनांचे राज्य संचालक प्रकाश मनुरे, जिल्हा युवक अधिकारी निशांत रौतेला व इतर उपस्थित होते. या भेटीनंतर काश्मिरी युवकांनी राजभवनातील क्रांतिकारकांच्या दालनाला भेट दिली.