वाराणसी – वाराणसी येथील काशी विश्वेश्वर मंदिराच्या २ किलोमीटर परिसरातील सर्व मांसाहारी दुकानांवर प्रतिबंध लावण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. कुंभ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. स्थानिक दुकानदारांनी मात्र या निर्णयाला विरोध केला आहे.
उत्तर प्रदेशातील काशी विश्वेश्वराचे मंदिर हे हिंदूंचे श्रद्धास्थान आहे. येथे लाखो भाविक येत असतात. या मंदिरात येणाऱ्यांच्या भाविकांच्या भावनांचा विचार करुन त्याचप्रमाणे परिसरातील स्वच्छतेचा विचार करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. नगर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून त्यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहे. आदेशात म्हटले आहे की, दोन किलोमीटर परिघातील सर्व मांस व मासळी विकणारी दुकाने परिघाच्या बाहेर नेण्यात यावीत. दुकानात मांस लटकवून त्याची विक्री करू नये. हा आदेश स्थायी असून भविष्यातही या परिसरात अशा प्रकारच्या कोणत्याही दुकानांना परवानगी दिली जाणार नाही. या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवण्यात येतील.
दरम्यान या दुकानदारांनी या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्ही गेल्या ३० वर्षांपासून इथे दुकान लावत आहोत. आमच्याकडे परवाने असून त्यासाठीचे शुल्कही आम्ही भरत आहोत. आम्ही स्वच्छतेच्या नियमांचे पालन करू. आतापर्यंत कधीही दुकानांवर आक्षेप घेण्यात आला नव्हता. गेल्या दोन-तीन वर्षांपासूनच हे सुरू झालेले आहे. त्यांनी आमचे २ किलोमीटर परिसराच्या बाहेर पुर्नवसन करावे. अद्याप आम्हाला अधिकृतपणे कोणतीही नोटीस वा आदेश प्राप्त झालेले नाहीत.