कोल्हापूर- काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्याला पनोरी येथील बोगद्याशेजारी तांबर नावाचा शेतकालवा पात्राच्या तळभागातून भले मोठे भगदाड पडले. यातून लाखो लिटर पाणी वाया जाऊन हजारो हेक्टर बागायत पिकांचे नुकसान झाले.वारंवार घडणाऱ्या कालवा फुटीच्या घटनेमुळे कालव्याचा मजबुतीविषयी पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.
सध्या काळाम्मावाडी धरणातून दुधगंगा डाव्या व उजव्या कालव्यात पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे.काल मध्यरात्री पाण्याचा जोरदार प्रवाहाने पनोरी येथील बोगद्याजवळ कालव्याला छिद्रे पडले.त्यानंतर या छिद्राचा व्यास जवळपास दहा फूट झाला आणि रात्रभर त्यातून पाण्याचा विसर्ग होऊन कालव्याखालील हजारो हेक्टर शेतपिकाचे नुकसान झाले.परिणामी संपूर्ण शिवाराला महापुराचे स्वरुप प्राप्त झाले.दुधगंगा नदीला मातिमिश्रित गढुळ पाणी आले.वारंवार घडणाऱ्या कालवाफुटीमुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असून पाटबंधारे खात्याने त्याची वेळीच दखल घेऊन डागडुजी करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.