‘काय डोंगर, काय झाडी’नंतर ‘काय कॅश,काय गाडी!’ गाडीत 5 कोटींची रोकड! मुख्यमंत्री शिंदेंकडून वाटप?

मुंबई – महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक जाहीर होताच नोटांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. काल रात्री पुणे जिल्ह्यातील खेड-शिवापूर टोल नाक्यावर पोलिसांनी एका इनोव्हा गाडीत 5 कोटींची रोकड पकडली. ही गाडी सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या मुलाची असल्याची चर्चा आहे. यावरून ठाकरे गटाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला की, मुख्यमंत्री शिंदे हो प्रत्येक उमेदवाराला 50 कोटी वाटत आहेत, त्याचा पहिला हप्ता म्हणून 15 कोटीचे वाटप झाले आहे, त्यातीलच हे 5 कोटी पकडले गेले.
उबाठा गटाचे संजय राऊत प्रतिक्रिया देताना म्हणाले की 15 कोटी रोकड भरलेल्या दोन गाड्या पकडण्यात आल्या. त्यापैकी एक गाडी पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून सोडली. तर रोहित पवार यांनी गाडीतील रोकडीच्या थप्प्यांचा व्हिडिओ ट्विट करीत 4 गाड्या होत्या असे म्हटले आहे . या आरोपांमुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात निवडणूक जाहीर झाल्यापासून मोठी रक्कम पकडली जाण्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. आता निवडणुकीच्या दिवसांत कॅश भरलेल्या अनेक गाड्या पकडल्या जातील. त्यातील रकमेवर कुणीच दावा करणार नाही आणि ही रक्कम नेमकी कुणाची आहे हे कधीच उघड करता येणार नाही.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते खा. संजय राऊत आज या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, काल 5 कोटी रुपयांची रोकड पकडल्याचे पोलिसांनी सांगितले असले तरी प्रत्यक्षात 15 कोटी रुपये पाठविण्यात आले होते. दोन गाड्यांमधून हे पैसे सांगोल्यातील उमेदवाराकडे जाणार होते. पोलिसांनी गाड्या अडवताच मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरून पोलिसांना फोन गेला. त्यानंतर पोलिसांनी एक गाडी सोडून दिली. या गाडीत दहा कोटी रुपये होते. हे दहा कोटी झाडी आणि डोंगरात व्यवस्थित पोहोचले. मात्र, आमचे कार्यकर्ते तिथे जमल्याने 5 कोटी पकडल्याचे दाखवावे लागले.
संजय राऊत यांनी पुढे याहून गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, निवडणूक जिंकण्यासाठी एकनाथ शिंदे प्रत्येक उमेदवाराला 50 कोटींहून जास्त निधी पाठवणार असल्याचे मी दोन-चार दिवसांपूर्वी सांगितले होते. आचारसंहिता लागू झाली, त्याच दिवशी राज्यातील बर्‍याच मतदारसंघात यातील पहिला हप्ता पोहोचला होता. खेड-शिवापूरच्या टोल नाक्यावर सापडलेली रोकड हा 50 कोटी रुपयांपैकी 15 कोटी रुपयांचा पहिला हप्ता होता. राज्यात 15-15 कोटी पोहोचले आहेत. आता 30-30 कोटी पोहोचणार आहेत. पोलिसांच्या संरक्षणात हे पैसे पोहोचणार आहेत. निवडणूक आयोग केवळ कारवाई केल्याचे नाटक करील.
रोकड जप्त केल्याप्रकरणात ज्यांचे नाव घेतले जात आहे ते उध्दव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात आलेले शहाजीबापू पाटील यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले की, या रकमेशी माझा काडीमात्र संबंध नाही. ज्याची गाडी पकडली तो अमोल नलावडे शेकापचा कार्यकर्ता आहे. त्याचे अनेक उद्योग आहेत. त्याबद्दल मला काही माहिती नाही. मी ही बातमी ऐकली, त्यात माझे नाव नाही. सत्ता गेल्यापासून संजय राऊत यांना रात्री झोपताना झाडी आणि उठल्यावर डोंगर दिसतात. ही गाडी सांगोल्याची असल्याने लगेच मला टार्गेट करायचा प्रयत्न करण्यात आला. या पैशाची अथवा गाडीशी माझा कोणताही संबंध नाही. विरोधकांकडून जाणीवपूर्वक मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी याप्रकरणी माहिती देताना सांगितले की, खेड-शिवापूर टोलनाक्याजवळ नाकाबंदीमध्ये MH 45 -S 2526 क्रमांकाची कार पकडली. या गाडीची माहिती आम्हाला मिळाली होती. ही कार मुंबईवरून कोल्हापूरला चालल्याची प्राथमिक माहिती होती. आयकर विभाग, निवडणूक आयोग यांच्यासोबत कारवाई करण्यात आली. गाडीत 5 कोटींची रक्कम सापडली. जप्त केलेली रक्कम तपासून घेतली आहे. या नोटा खोट्या नाहीत. ज्याच्याकडे हे पैसे सापडले त्याने मी रस्ता बांधकाम व्यावसायिक आहे, असा दावा केला आहे. हे पैसे माझेच आहेत, असे त्याचे म्हणणे आहे. त्याने तसा जबाब आयकर विभागाला दिला आहे. पैसे कुठून आले आणि कुठे नेले जात होते याबाबत आमचा तपास सुरू आहे. ही रोकड आता आयकर विभागाकडे सुपूर्द केली आहे. या पैशाचे काही राजकीय संबंध आहे का याचाही तपास सुरू आहे. या गाडीत चार जण होते. त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले आहे. या रकमेचा तपशील आयकर विभागाकडे जमा करण्यास सांगण्यात आला आहे.
आरटीओच्या नोंदीनुसार ही गाडी अमोल नलावडे यांच्या मालकीची आहे. या प्रकरणात नाव आल्यावर अमोल नलावडे याने वेगळाच दावा केला. तो म्हणाला की, गाडी माझ्या नावावर असली तरी ती कधीच बाळासाहेब आजबे यांना विकली आहे. हा व्यवहार पूर्ण झाला असून, मी त्याचे पैसेही घेतले आहेत. मात्र, काही कारणाने गाडी त्यांच्या नावाने ट्रान्सफर झाली नाही. मी एक व्यावसायिक आहे. मी कुठल्याच पक्षाशी संबंधित नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top