मुंबई – राज्य सरकारने मुंबईतील कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्पाचा आराखडा जाहीर केला असून त्यानुसार मूळ जागामालकांना प्रत्येकी ५०० चौरस फुटाचे घर मिळणार आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात हिरवा कंदिल दिला होता.दक्षिण मुंबईतील २७.५९ एकरावर असलेल्या या जागेत हा पुर्नविकास प्रकल्प राबवला जाणार आहे. या जागेच्या आराखड्यानुसार ५० चौरस मिटर जागा असलेल्या मालकांना ५०० चौरस फुटाचा फ्लॅट मिळणार आहे. ५१ ते १०० चौरस मिटर जागा असलेल्यांना ५०० चौरस फुटाचे दोन फ्लॅट तर दिडशे ते दोनशे चौरस मिटर असलेल्यांना ४ फ्लॅट मिळणार आहेत. या संदर्भातील आदेश राज्याच्या गृहनिर्माण विभागाने जारी केली आहे. या आदेशामुळे या परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून गेल्या वर्षभरापासून नेमके किती फुटाचे घर मिळणार हे अनिश्चित असल्यामुळे नागरिकांचा या प्रकल्पाला विरोध होता. या प्रकल्पाच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अतिरीक्त मुख्य सचिव वल्सा नायर यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणाही विभागाने केली आहे.मुंबादेवीचे आमदार अमीन पटेल यांनी म्हटले आहे की, या भागातील कोणाला किती फुटाचे घर मिळणार हे स्पष्ट झाल्याने लोकांच्या मनात आशा निर्माण झाली . मात्र या आदेशात व्यावसायिक जागा असलेल्यांना काय मिळणार हे स्पष्ट नाही. कामाठीपुरा पुर्नविकास प्रकल्प हा बीडीडी चाळींच्या पुर्नविकास प्रकल्पाच्या धर्तीवर राबवण्यात येणार आहे